पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर व पुण्यातील एल 3 पबमधील ड्रग पितानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर शहरातील बेकायदेशीर बांधकाम असलेल्या आस्थापनांवर (हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट, क्लास) कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेचे नियम धाब्यावर बसवून त्यातच नोटिसा बजावूनही अनाधिकृत बांधकाम न काढणार्या हॉटेल, कॅफेे, पब, बार, तसेच इतर १४ आस्थापनांसह त्यांच्या मालकांवर विमानतळ पोलिस ठाण्यात पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या गुन्ह्यात वाईन्ड शुगर कॅफे, द ३ मस्केटीअर, थोरात बार्बेक्यु, चाटस न व्रेप्स, स्याश बार, द बानयार्ड कॅफे, टेल्स स्पिरीट हंटर बिस्ट्रो, पिंड पंजाब, द चाय कॅफे यांच्या मालकांवर कनिष्ठ अभियंता अभिषेक कुसाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२, ४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आस्थापनांनी अनाधिकृत वाढीव बांधकाम केल्याचे आढळल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या गुन्ह्यात विमानगर येथील लाउंज अॅन्ड बारचे मालक यांच्यावर अनधिकृत पत्राशेडचे बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता अभिषेक कुसाळकर यांना विमाननगरमधील फिनिक्स मार्केटसिटी असलेल्या बॅकस्टेज लाउंज अॅण्ड बार येथे १४ मीटर बाय १५ मीटरचे पत्राशेड बांधल्याचे निदर्शनास आले. जानेवारी २०२२ मध्ये नोटीस बजावूनही अनधिकृत बांधकाम केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्या गुन्ह्यात पालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर पार्किंग व्यावसाय सुरू केल्याप्रकरणी नोटीस बजावून अनधिकृत केलेले बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती. त्या अनुषंगाने २३ एप्रिल २०२४ रोजी कारवाई केली होती. तरीही पार्कींग व्यवसाय सुरू ठेवल्याने कारवाई करण्यात आली.
विमाननगर येथील पेठ लोहगाव येथे अनधिकृत बांधकाम करून नुक्कड कॅफे व क्रिस्टाईडस क्लासेस चालू केल्याने सलीम शेख आणि हानिफ शेख (रा. पेठ लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहणीमध्ये १८ बाय १५ मीटर व २७ बाय २५ मीटरचे अनधिकृत पत्राशेड मारल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.
विमाननगर येथील बिपीन घोरपडे यांनी जमिनीचा वापर बदलून निवासीऐवजी व्यापारी वापर करून जोशी वडेवाले हे हॉटेल सुरू केल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.