खालापूर, (वार्ताहर) – मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (दि. २८) दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात कारमधील दोघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. मुंबई मार्गिकेवर किमी 35/800 जवळ हा अपघात झाला.
कंटेनर क्रमांक (एनएल ०१ एबी ७२०८), कंटेनर क्रमांक (एमएच ४६ बीएम १५३५) व कार क्रमांक (एमएच ४३ बीई ८५६२) ही तीनही वाहने मुंबई लेन वरून जात असताना उतारावर चालकांचे नियंत्रण सुटल्याने एकमेकांना धडकली. यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. अमोल खरमाले (रा. नवी मुंबई, चालक) व संजय नवले (रा. पिंपरी चिंचवड) अशी जखमींची नावे आहेत. मृतांची नावे समजू शकली नाहीत.
या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृतांचे मृतदेह खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.