जांबूत, (वार्ताहर)- जांबूत (ता. शिरूर) येथील इंदिरा आवास घरकुल घोटाळाप्रकरणी फसवणूक झाल्याने लाभार्थी उषा रणदिवे यांनी सोमवार (दि.२४) पासून शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. गटविकास अधिकारी महेश डोके यांनी र्उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले होते. मात्र, रणदिवे यांनी आपल्वा मागण्यांवर ठाम राहून उपोषण सुरूच ठेवले आहे.
उषा रणदिवे यांना योग्य न्याय न मिळाल्याने त्यांनी शिरूर तहसिल कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या निर्देशानुसार शनिवार (दि. २४) जांबूत येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्रीकांत दणाणे यांचेसह शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता बांधकाम उपविभाग शिरूर यांच्याकडून स्थळपाहणी केली होती. मात्र, स्थळपाहणी करून जे घरकुल दाखविले होते. ते अन्य लाभार्थ्याच्या नावे असल्याचे सांगण्यात आले होते.
यावेळी ठरल्याप्रमाणे लाभार्थी उषा रणदिवे हे आपला मुलगा विशाल रणदिवे याच्यासह शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणास बसलेल्या असताना लाभार्थीने शिरूर पोलीस स्टेशनला केलेल्या पत्रव्यव्हाराची दखल घेत शिरूरचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांचे पत्रावरून गटविकास अधिकारी डोके यांना कार्यवाही करण्याबाबत सूचित केले.
याबाबत दखल घेऊन स्थळपाहणीचा व पंचनामाचा अहवाल आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. त्याचे अवलोकन करता आपणांस न्याय व घरकुल प्रकरणातील अजून काही बाबींवर सखोल चौकशी करणार आहे.
दहा दिवसांत चौकशीअंती दोषी आढळून येणाऱ्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तोपर्यंत उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन गटविकास अधिकारी महेश डोके यांनी रणदिवे यांना केले. मात्र, रणदिवे या आपल्या मागण्यावर ठाम राहिल्या आहेत.