Entertainment । बॉलीवूड किंग शाहरुख खानचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 2017 सालचा असून या व्हिडिओमध्ये शाहरुख प्रेस कॉन्फरन्समध्ये गेल्या दीड वर्षांपासून महाभारत वाचत असल्याचं सांगत आहे.
इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये तो आपला लहान मुलगा अबराम यालाही महाभारताच्या कथा कथन करत असल्याचंही ऐकायला मिळत आहे, या व्हिडिओवर चाहते लाईकचा वर्षाव करत आहे. हा व्हिडिओ शाहरुख खान 2017 मध्ये ईदच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेतील आहे. व्हिडिओत तो म्हणाला,’माझ्या आई-वडिलांनी मला प्रत्येक धर्माबद्दल सांगितले आहे. मी जेव्हाही रामलीलाला जायचो तेव्हा मी आनंदी असायचो आणि जेव्हाही मी ईदला जायचो तेव्हा सुद्धा आनंदी असायचो. माझ्या पालकांप्रमाणेच मी माझ्या मुलांना सर्व धर्मांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो.”
शाहरुख पुढे म्हणाला, ‘मी गेल्या दीड वर्षांपासून महाभारत वाचत आहे कारण मला कथा खूप आवडतात. मी अब्रामलाही सांगतो. होय..! त्याला मजा येईल म्हणून पण कथेमध्ये थोडेफार बदल करतो..’ असं अभिनेता म्हणाला होता. तर शाहरुख कथेत काय बदल करायचा… याबद्दल देखील अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं होतं.
कथेबाबत त्याने सांगितले, ‘मी अबराम याला देखील महाभारत वाचून दाखवतो. पण कथांमध्ये थोडे फार बदल करतो, ज्यामुळे त्याला ऐकायला आनंद वाटेल. इस्लाम धर्मातील देखील जे किस्से मला माहिती आहेत, ते देखील मी अबराम याला रंजक करुन सांगतो. माझी एकच इच्छा आहे, माझ्या मुलांनी सर्व धर्मांबाबत शिकावं आणि सर्व धर्मांचा आदर करावा…’ असं शाहरुख म्हणाला होता.