UEFA Euro Cup 2024 :- ज्युड बेलिंगहॅमने युरो अजिंक्यपद स्पर्धेत आपली लय कायम राखली आहे. बेलिंगहॅमने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर इंग्लंडने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत सर्बियावर १-० असा संघर्षपूर्ण विजय नोंदवला.
इंग्लंडच्या संघाला यंदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. गेल्या युरो स्पर्धेत इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा इंग्लंडला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार असल्याचे सलामीच्या सामन्यानंतर स्पष्ट झाले आहे. उंचपुऱ्या खेळाडूंचा भरणा असलेल्या सर्बियाच्या संघाने इंग्लंडसमोर आव्हान उपस्थित केले. परंतु सर्बियाला अखेरपर्यंत गोलचे खाते उघडता आले नाही आणि इंग्लंडने निसटता विजय मिळवला.
नुकत्याच संपलेल्या क्लब फुटबॉलच्या मोसमात मध्यरक्षक असलेल्या बेलिंगहॅमने रेयाल माद्रिदसाठी उत्कृष्ट कामगिरी केली. रेयालच्या संघाने ला लिगा, स्पॅनिश सुपर चषक, चॅम्पियन्स लीग अशा तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या आणि या यशात बेलिंगहॅमची भूमिका महत्त्वाची होती. त्याने युरो स्पर्धेचीही सुरुवात दमदार केली.
UEFA Euro Cup 2024 : वाऊट वेघोर्स्टच्या खेळीने नेदरलँड्सचा दमदार विजय…
पूर्वार्धात बुकायो साकाच्या उजव्या बाजूने आलेल्या क्रॉसवर जोरदार हेडर मारून गोल करत बेलिंगहॅमने इंग्लंडला १३ व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. यानंतर बरोबरी साधण्याचे सर्बियाकडून बरेच प्रयत्न झाले. परंतु त्यांना यश मिळाले नाही.