पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – चालू व थकीत वीजबिल भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
बिलांचा नियमित भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील २० लाख ३५ हजार ९४४ ग्राहकांकडे ४८४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी दि. २९ व ३० जूनला वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.
ग्राहकांना ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर, तसेच मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध आहे, तसेच ५ हजारांपेक्षा अधिक रकमेचे बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरता येईल. त्यासाठीचा तपशील ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.