चांदखेड, (वार्ताहर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळच्या न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात मिळालेला आहे.
कार्यक्रमास अर्थ उन्नती अर्बन नि. लि. बँकेचे संचालक व नवयुग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हभप अक्षय महाराज येवले प्रमुख म्हणून उपस्थित होते. या वेळी युवा कीर्तनकार जयश्री येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संत, महात्मे व इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घ्यावा.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील आदर्शांचा अंगीकार विद्यार्थ्यांनी जीवनात करून स्वतःचा उत्कर्ष करावा, असे जयश्री येवले यांनी सांगितले.
या वेळी संजीव भालेराव उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अजिनाथ ओगले यांनी विद्यार्थ्यांना, अभ्यास करून स्वतःमधील क्षमता विकसित करून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवावा, असे आवाहन केले. विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापक सत्यवान पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शुभांगी पवार यांनी आभार मानले.