तळेगाव दाभाडे, (वार्ताहार) – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळ तालुक्यातील 11 माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांना ५ लाख ४५ हजार रुपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले असल्याचे बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी सांगितले.
तालुक्यातील शाळांची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्यासाठी बँकेने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या शैक्षणिक फंडातून विविध शाळांना ही मदत केली आहे.
माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयाला मिळणाऱ्या या निधीतून संस्थांनी शैक्षणिक साहित्य, संगणक, प्रिंटर्स, संगणक प्रोजेक्टर, वॉटर कुलर, भौतिक साहित्य खरेदी करावे व त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व्हावा म्हणून बँकेने ही शैक्षणिक मदत केली असल्याचे सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज कार्ला, श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण, गोल्डन ग्लेड्स माध्यमिक शाळा करंजगाव, प्रगती विद्या मंदिर इंदोरी, सावित्रीबाई फुले महाविद्यालय कला आव वाणिज्य महाविद्यालय, प्रतिक विद्यामंदिर निगडे, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे,
भैरवनाथ विद्यामंदिर वराळे, पद्मावती विद्यामंदिर उर्से या माध्यमिक विद्यालयांना व कनिष्ठ महाविद्यालयांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी धनादेश देण्यात आले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांनी धनादेश स्विकारले.
‘गेली अनेक वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मावळ तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांना दरवर्षी अशाच प्रकारची आर्थिक मदत करत असते. या मदतीमधून शाळांची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य खरेदी करावे, अशी अपेक्षा बँकेची आहे.’ – माऊली दाभाडे (संचालक, पीडीसीसी बँक)