नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी शुक्रवारी ईडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. केजरीवाल मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असल्यासारखी ईडीची वर्तणूक असल्याचे त्या म्हणाल्या. केजरीवाल यांना गुरूवारी जामीन मंजूर झाला. त्यासंबंधीचा आदेश शुक्रवारी सकाळी अपलोड झाला असता. मात्र, त्याआधीच ईडीने दिल्ली उच्च न्यायालय गाठले. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामिनाला स्थगिती देण्यात आली आहे.
देशातील हुकूमशाहीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी आक्रमक भूमिका सुनीता यांनी मांडली. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या ठिकाणी त्या बोलत होत्या. दरम्यान, आपचे नेते संजय सिंह यांनी सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उठवली.
विशेष न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे भाजपने रचलेले कारस्थान उघड झाले. मात्र, जामीन मंजूर करण्याच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी मोदींची ईडी तातडीने उच्च न्यायालयात पोहचली. देशात काय घडत आहे? मोदी न्यायव्यवस्थेची चेष्टा करत आहेत. संपूर्ण देश ते पाहत आहे, असे सिंह यांनी म्हटले.