पिंपळे गुरव (वार्ताहर) – गेल्या दोन वर्षांपासून नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील प्रवाशांना उन्हात आणि पावसात बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. स्मार्ट सिटीच्या कामासाठी काढलेले बस शेड उभारण्यास प्रशासन विसरले आहे.
स्मार्ट सिटीने काम संपले सांगून हात वर केले आहेत. तर महापालिकेचे अधिकारी तरतूद नसल्याचे आणि बस शेड होते की नाही याबाबत माहीत नसल्याचे सांगत आहेत. यामुळे या पावसाळ्यातही प्रवाशांनी बसची वाट पाहत भिजायचे का? असा प्रश्न उपस्िथत होत आहे.
साई चौकाकडून काटे पुरमच्या दिशेने जाताना कृष्णा चौक येथे पीएमपीएलचा बस थांबा आहे. मात्र तिथे ना बस थांबाचा फलक लावण्यात आला आहे, ना बस थांब्यावर शेड उभारण्यात आले आहे. पीएमपीएल बस मात्र येथे थांबते.
त्यामुळे प्रवाशी देखील बस येथे थांबत असल्याने रस्त्यावर, पदपथावर ताटकळत उन्हातान्हात उभे राहत असतात. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, पदपथ तयार करीत असताना येथील पीएमपीएलचा बस शेड काढण्यात आला होता. मात्र सर्व कामे पूर्ण होऊन देखील दोन वर्ष होऊन गेले. महापालिकेकडून अजूनही पीएमपीएलचा बस शेड येथे उभारण्यात आला नाही.
उल्लेखनीय बाब अशी की परिसर स्मार्ट करत असताना नागरिकांची मुख्य गरजच स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिका व पीएमपीएमएल प्रशासनाने लक्षात घेतली नाही. स्मार्ट सिटीचे अधिकारी आता काम संपले आता उभारता येणार नाही, असे सांगत आहेत. तर महापालिकेचे अधिकारी सध्या तरतूदच नाही आणि येथे बस शेड होते की नाही याबद्दलही अनभिज्ञ आहेत.
स्मार्ट सिटीचे काम संपले आहे. त्यामुळे आता स्मार्ट सिटीकडून बस शेड उभारता येणार नाही. महापालिकेच्या संबंधित स्थापत्य विभागाशी बोलावे लागेल. चंद्रकांत मोरे, स्मार्ट सिटी अधिकारी
सध्या तरी तरतूद नाही. आणि तिथे आधी बस शेड होते याबाबत मला माहीत नाही. पाहणी करून काही करता आले तर बघू. आत्ताच तसे सांगू शकत नाही. जयकुमार गुजर, स्थापत्य कनिष्ठ अभियंता
कृष्णा चौकात दुतर्फा बाजूस पीएमपीएलचा बस थांबा आहे. फलक लावण्यात आला आहे. मात्र विरुद्ध दिशेला बस शेड का उभारत नाही. महापालिकेकडून असा दूजाभाव का केला जात आहे. संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते