बेल्हे, (वार्ताहर) – सेवा सहयोग फाउंडेशन ठाणे (मुंबई) या सेवाभावी संस्थेच्या वतीने बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील गुरुवर्य ए. गो. देव प्रशाला व जि.प.प्राथमिक शाळा या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे नुकतेच वाटप करण्यात आले, अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक शमशुद्दिन पटेल व प्राथमिक शाळेचे मुख्याधयापक भाऊसाहेब गवळी यांनी दिली.
बोरी खुर्द येथील गुरुवर्य ए.गो.देव प्रशाला व जि. प. प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या संस्थेच्या वतीने नुकतेच अतिशय उच्च प्रतीचे स्कूल किटचे वाटप करण्यात आले.
या किटमध्ये दफ्तर, वह्यांचा संच, कंपास बॉक्स, आलेख वही, चित्रकला वही व इतर साहित्य देण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी संपत बांगर यांच्या विशेष प्रयत्नातून शाळांसाठी ही मदत मिळवून देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपत बांगर होते. या प्रसंगी सर्वोंनती मंडळाचे अध्यक्ष विक्रम शिंदे,उपाध्यक्ष लक्ष्मण काळे,सचिव नरहरी शिंदे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ बांगर, पोलीस पाटील अक्षय काळे, गोरक्ष शेटे, रोहन बेल्हेकर, दोन्ही शाळांचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास मटाले यांनी केले. तर, शमशुद्दीन पटेल यांनी आभार मानले.