मुंबई – व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला आहे. बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे.
1910साली विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात छोटेसे किराणामालाचे दुकान सुरू केले. त्याच दुकानात त्यांनी मसाले आणि लोणची ठेवण्यास सुरूवात केली. मसाले लोणची यांचा खप वाढल्याने त्यांनी दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली.
मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे व्यवसायाचा व्याप वाढता राहिल्यावर 1943मध्येच “व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असे कंपनीचे नामकरण केले. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. फक्त देशात नाही तर ज्या-ज्या देशात मराठी माणूस पोहचला तिथे तिथे बेडेकर उत्पादनंही पोहचली. 1960साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या. आणि मग लोणचे निर्यात होऊ लागले.
कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास 600 टन लोणचे सीझनला बनतं. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते. दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.