Dinesh Karthik In IPL 2025 : दिनेश कार्तिकने त्याच्या कारकिर्दीतील शेवटची आयपीएल 2024 मध्ये खेळली होती. आयपीएल 2024 (IPL 2024) नंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) च्या यष्टीरक्षक फलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता आरसीबीनेच सांगितले आहे की, दिनेश कार्तिक पुढील वर्षी म्हणजेच 2025 च्या आयपीएलमध्ये संघात परतणार आहे. त्यामुळे कार्तिकने निवृत्ती मागे घेतली आहे का? काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
कार्तिकने आयपीएल 2024 खेळल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती आणि पुढील वर्षी म्हणजे आयपीएल 2025 मध्येही त्याची निवृत्ती कायम राहणार आहे. त्यामुळे आता कार्तिक पुन्हा आरसीबीमध्ये कसा परतणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक, बंगळुरूने दिनेश कार्तिकची फलंदाजी प्रशिक्षक तसेच संघाचा मार्गदर्शक (batting Coach and mentor) म्हणून नियुक्ती केली आहे. अशा प्रकारे 2025 च्या आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक पुन्हा पुनरागमन करेल. यावेळी कार्तिक नव्या अवतारात दिसणार आहे. कार्तिक संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक नील मॅकेन्झी यांची जागा घेणार आहे.
कार्तिक फलंदाजी प्रशिक्षक बनल्याची माहिती आरसीबीच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आली. संघाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “आमच्या कीपरचे (यष्टीरक्षक) स्वागत आहे, दिनेश कार्तिक एका नवीन अवतारात आरसीबीमध्ये परतला आहे. डी.के. हा आरसीबी पुरुष संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असणार आहे. तुम्ही या माणसाला क्रिकेटपासून दूर ठेवू शकता पण क्रिकेटला माणसाच्या बाहेर नाही!”
Welcome our keeper in every sense, 𝗗𝗶𝗻𝗲𝘀𝗵 𝗞𝗮𝗿𝘁𝗵𝗶𝗸, back into RCB in an all new avatar. DK will be the 𝗕𝗮𝘁𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 𝗮𝗻𝗱 𝗠𝗲𝗻𝘁𝗼𝗿 of RCB Men’s team! 🤩🫡
You can take the man out of cricket but not cricket out of the man! 🙌 Shower him with all the… pic.twitter.com/Cw5IcjhI0v
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) July 1, 2024
कार्तिक अनेक फ्रँचायझींसोबत खेळला, पण आरसीबीच खास..
कार्तिकने 2008 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (तत्कालीन दिल्ली डेअरडेव्हिल्स) मधून आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सचा भाग बनला. त्यानंतर 2015 मध्ये कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला. यानंतर कार्तिक गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनला. त्यानंतर तो 2022 मध्ये आरसीबीमध्ये परतला आणि 2024 पर्यंत बेंगळुरूकडून खेळला. कार्तिकने 2024 नंतर निवृत्ती जाहीर केली होती. आता तो संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक बनला आहे.
कार्तिकची अशी होती आयपीएल कारकीर्द…
यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण 257 सामने खेळले आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 4 हजार 842 धावा झाल्या. कार्तिक हा गेल्या काही वर्षांपासून आयपीएलचा सर्वोत्तम फिनिशर आहे. कार्तिकच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 22 अर्धशतके आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 97 आहे. कार्तिक हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधारही राहिला आहे.