राहाता, (प्रतिनिधी)- तालुक्यातील साकुरी गावातून जाणाऱ्या श्री क्षेत्र साकुरी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे दि. 2 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
श्री उपासनी कन्याकुमारी स्थान येथे कन्या वृंदांच्याहस्ते या पायी दिंडी पालखीचे मार्गक्रमण सुरू होईल, अशी माहिती सेवेकरी संजय निरगुडे व संजय उपाध्ये यांनी दिली.
साकुरी ते पंढरपूर जाणारी पायी पालखी दिंडीचे हे सातवे वर्ष आहे. दि.2 जुलै रोजी प्रस्थान केलेली दिंडी दि. 18 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे दि. 18 जुलै रोजी हभप योगेश महाराज वाघाडीकर यांच्या काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाची पंगत व सांगता होईल.
काल्याचा महाप्रसादरुपी सेवा शिर्डी येथील राधाकिसन भाऊराव शिंदे यांनी दिली आहे. पंढरपूर येथील सोलापूर-पंढरपूर रोड या ठिकाणी असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील वैष्णव सदन भक्तनिवास येथे दिंडी थांबणार आहे.