नवी दिल्ली : देशातील लोकसभेच्या ८ जागांवरून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (इव्हीएम) पडताळणीची मागणी करण्यात आली आहे. त्याविषयीचे अर्ज ६ राज्यांमधून निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, हरियाणा, तेलंगणा आणि छत्तीसगढ आदी राज्यांतून संबंधित अर्ज दाखल झाले आहेत.
इव्हीएम पडताळणीची मागणी करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पराभव पत्करावे लागलेले भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांचा समावेश आहे. तशाच स्वरूपाची मागणी कॉंग्रेस, वायएसआर कॉंग्रेस, डीएमडीकेच्या पराभूत उमेदवारांनीही केली आहे. लोकसभेच्या ८ जागांवरून मिळून ९२ मतदान केंद्रांवरील इव्हीएमची पडताळणी अर्जदारांना हवी आहे.
एका इव्हीएमच्या पडताळणीसाठी ४७ हजार २०० रूपये शुल्क अर्जदारांना भरावे लागणार आहे. पराभूत झालेल्या पण दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानांवर राहिलेल्या उमेदवारांनाच पडताळणीची मागणी करण्याची परवानगी आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ टक्के इव्हीएमच्या पडताळणीची मागणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. आंध्र आणि ओडिशात विधानसभा निवडणुकांत पराभूत झालेल्या अनुक्रमे वायएसआर कॉंग्रेस आणि बिजदच्या काही उमेदवारांनीही पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.