Wimbledon Open 2024 (Carlos Alcaraz vs Mark Lajal) :– गतविजेत्या कार्लोस अल्कराझने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात केली. पहिल्या फेरीच्या लढतीत अल्कराझने पात्रता फेरीतून आलेल्या मार्क लजालचा ७-६ (७-३), ७-५, ६-२ असा पराभव केला.
अल्कराझचा विजय सरळ सेटमध्ये दिसत असला, तरी पहिल्या दोन सेटमध्ये लाजलने निश्चितपणे आव्हान उभे केले होते. जागतिक क्रमवारीत २६९ व्या स्थानावर असलेल्या लाजलच्या प्रतिकारामुळे अल्कराझही चकित झाला होता.
महिला एकेरीत नवव्या मानांकित मारिया सक्कारीने विजयी सुरुवात करताना मॅकॅर्टनी केसलरला ६-३, ६-१ असे सहज पराभूत केले. फ्रेंच खुल्या स्पर्धेची उपविजेती जॅस्मिन पाओलिनीने चौथ्या प्रयत्नात विम्बल्डनची पहिली फेरी पार केली. तिने सारा सोरिबेस टोर्मोचाचा ७-५, ६-३ असा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत डॅनिल मेदवेदेवने अलेक्झांडर कोवासेविचचा ६-३, ६-४, ६-२, कॅस्पर रूडने अलेक्स बोल्टचा ७-६ (७-२), ६-४, ६-४, डेनिस शापावालोवने निकोलस जॅरीचा ६-१, ७-५, ६-४ असा पराभव केला.
Euro Cup 2024 (Round of 16) : इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, स्लोव्हाकियावर केली मात…
सबालेन्काची माघार
महिलांमध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या अरिना सबालेन्का आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी खांद्याच्या दुखापतीमुळे ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली. सबालेन्काला तिसरे मानांकन देण्यात आले होते.