नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक चित्रपट येत्या 5 तारखेला प्रकाशित होत असून त्यावर राजकीय पक्षांकडून जो आक्षेप घेण्यात आला आहे त्यावर निवडणूक आयोगाने आता भाजपकडूनही त्यांचे म्हणणे मागवले आहे. त्यांचे म्हणणे आल्यानंतर या चित्रपटाविषयी निवडणूक आयोगाकडून निर्देश जारी केले जाणार आहेत. येत्या दोन दिवसांत त्या विषयीनिर्णय अपेक्षित आहे. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला जे निवेदन दिले आहे त्यात भाजपच्या नावाचा उल्लेख असल्याने त्याविषयी त्यांचेही म्हणणे ऐकून घेणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
चित्रपटाला राजकीय आक्षेप घेण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन प्रकरणात जे निर्णय दिले आहेत त्याचाही संदर्भ निवडणूक आयोगाने घ्यायचे ठरवले आहे. मोदींच्या चित्रपटाला निवडणूक काळात बंदी घालावी अशी मागणी करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयातही करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल अशी भूमिका दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आहे.