अकोला – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय काँग्रेस कार्यकर्त्याने स्वतःच्या हाताने धुतल्याची घटना अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले असून, त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, नाना पटोले सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. तिथे त्यांची लाडूतुला होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमोद डोंगरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती. त्यामुळे पटोले यांना संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही.
पण पालखी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. पटोले यांनी या चिखलातून वाट काढत पालखीचे दर्शन घेतले. यामुळे त्यांचे पाय चिखलाने भरले. हे पाय धुण्यासाठी त्यांनी पाणी मागितले. त्यानंतर त्यांनी पाय धुण्याचा प्रयत्न केला असता एका कार्यकर्त्यानेच पुढाकार घेत स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतले.
पटोलेंनी कार्यकर्त्याच्या हातून स्वतःचे पाय धुवून घेतल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले आहे. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तूर्त या प्रकाराची राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चा सुरू आहे.