मुंबई : ज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सरकारने राज्यासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पाहात बसला आहे. पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा यात उल्लेख नाही. कृषी, पाटबंधारे, सामाजिक न्याय, गृहनिर्माण अशी विभागवार निधीची तरतूद नसणारा राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कितपत होईल याबाबत शंका असून राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीचा दारुण पराभव केल्याने चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने घोषणांचा पाऊस पाडला आहे, पण जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याची सरकारची घोषणा फसवी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याची सरकारची घोषणा फसवी आहे. शेतकऱ्यांच्या थकीत विज बिलाबाबत यात काहीही स्पष्टता नाही अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.