पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – शहरातील उन्हाचा वाढता चटका आणि उकाड्यामुळे पाऊस गेला कुणीकडे असे म्हणण्याची वेळ आली आहे. रविवारी (दि. 23) शहराच्या मध्यवर्ती भागात चांगलाच उन्हाचा चटका वाढला होता. परिणामी कमाल तापमान 35 अंशाच्या पुढे गेले. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास चिंचवड परिसरात ढगफुटीसदृश्य तब्बल 114 मिमी पाऊस झाला.
शहर-उपनगरांत रविवारी (दि. 23) सकाळपासून उन्हाचा चटका वाढत होता. त्यामुळे 30 ते 32 च्या आसपास असलेले कमाल तापमान 34 ते 36 च्या जवळपास पोहचले. त्यामुळे उकाडाही वाढला होता. वडगावशेरी येथे 36, कोरेगांव पार्क 35, हडपसर 34.4, शिवाजीनगर 33.8, पाषाण 33 तर एनडीए परिसरात 32.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
शहरासह जिल्ह्यात रविवारी झालेला पाऊस
चिंचवड 115, नारायणगाव – 34, गिरीवन – 17, हवेली – 12, एनडीए – 7, खेड – 4, राजगुरूनगर – 2, कोरेगांव पार्क – 1
दोन दिवस यलो, तर दोन दिवस अॅरेंज अलर्ट
पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल. त्यामुळे दि. 24 आणि 25 जून रोजी पुणे वेधशाळेने यलो अलर्ट दिला आहे. मात्र, दि. 26 आणि 27 जूनला पावसाचा जोर वाढणार असल्याने आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे.