Chhagan Bhujbal । Laxman Hake । Manoj Jarange : लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे मागील काही दिवसांपासून ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असून काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
या शिष्टमंडळामध्ये 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, गुलाबराव पाटील यांच्यासह इतर नेत्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, काल माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेवर निशाणा साधला. त्याला मनोज जरांगे यांनीदेखील जशाच तसे उत्तर दिले. यादरम्यान जरांगे यांनी छगन भुजबळ यांना गंभीर इशारा दिला होता.
ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळच सगळे पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला होता.
मात्र, आता मनोज जरांगेंच्या या वक्तव्याची मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेतली असून, त्यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, ‘मी मंत्रिपदाचा राजिनामा दिला होता, तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलाय. माझं राजकीय करिअर संपवणं हे पार्टीच्या आणि त्याआधी जनतेच्या हातात आहे. मला घरी बसवलं तरी मी रस्स्त्यावर उतरुन ओबीसींसाठी लढत राहणार आहे, असंही भुजबळ म्हणाले.