नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रोने इतिहास रचला आहे. कारण अशी कामगिरी करणारी इस्रो ही जगातील पहिली संस्था आहे. चांद्रयान-3च्या लक्षणीय यशानंतर इस्रोने आता चांद्रयान-4वर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. चांद्रयान-4 एकाच वेळी नाही तर दोन प्रक्षेपणांमध्ये पाठवले जाणार आहेत. हे भाग प्रथम कक्षेत पाठवले जातील आणि नंतर चंद्रावर जाण्यापूर्वी अवकाशात ते एकमेकांना जोडले जातील. कारण चांद्रयान-4ची वहन क्षमता इस्रोच्या सध्याच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल. ते अंतराळात जोडले गेल्यास, हे जगात प्रथमच घडेल आणि चंद्रावर पोहोचण्यापूर्वीच इस्रो इतिहास रचेल, असे एस. सोमनाथ म्हणाले. चंद्रावरून नमुने आणणे हे चांद्रयान-4चे मुख्य लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
इस्रोचे चांद्रयान-4 हे एक अतिशय गुंतागुंतीचे, पण महत्त्वाचे मिशन आहे. याची खासियत म्हणजे, लँडर इस्रो तयार करत असून रोव्हर मॉड्यूल जपान तयार करत आहे. इस्रो आणि जपानच्या JAXA द्वारे संयुक्तपणे ही मोहीम राबवले जात आहे. 2026पर्यंत चंद्रावर यान पाठवण्याची तयारी सुरू आहे. चांद्रयान-4चे लँडिंग साइट शिव-शक्ती पॉइंट असेल, असे इस्रोने आधीच सांगितले आहे. जिथे चांद्रयान-3 उतरले होते, तेच शिव-शक्ती पॉइंट आहे. चांद्रयान-3ने लँडिंगनंतर चंद्रावरील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा शोध घेतला होता. नव्या मिशनमध्ये त्याचा खूप फायदा होणार आहे.
इतर काही अंतराळ संशोधन संस्थांनी यापूर्वीच यानाचे भाग इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये एकत्र जोडण्याचे काम केले आहे. पण, इस्रो आणि JAXAचा हा प्रयत्न जगात पहिलाच असेल. कारण अंतराळ यान स्वतंत्र भागांमध्ये लॉन्च करून नंतर ते भाग अवकाशात जोडले जाणार आहेत. या पराक्रमामुळे इस्रो चंद्रावर उतरण्यापूर्वीच इतिहास रचणार आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान सोमनाथ म्हणाले, चंद्रावरून नमुने पृथ्वीवर कसे आणायचे? या दृष्टीने आम्ही चांद्रयान-4ची रचना तयार केली आहे, असे सोमनाथ यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. आमची सध्याची रॉकेट क्षमता जास्त नसल्याने हे यान आम्ही अनेक प्रक्षेपणांसह करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचेही त्यांनी म्हटले होते.