मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. खडसे यांनी यापूर्वी अनेकदा आपली नाराजी जाहीररीत्या बोलून दाखवली असल्याने त्यांच्या पक्षबदलाबाबतच्या चर्चा याआधीही रंगल्या होत्या. मात्र खडसे यांनी भाजपला रामराम ठोकण्याबाबतचा निर्णय अद्यापतरी घेतलेला नाही.
दरम्यान, खडसे भाजप सोडणार ही चर्चा पुन्हा सुरु झाल्याने याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना पाटील यांनी खडसे पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणाले, “एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने त्यांना आजवर भरभरुन दिलं आहे. त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका ते घेणार नाहीत. याआधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. ही देखील अफवाच ठरेल”
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी, शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये खडसेंबाबत कोणीतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.