नवी दिल्ली : देशभरात मोठे वादळ निर्माण करणाऱ्या नीट-युजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने गुरूवारी कारवाईचे पहिले पाऊल उचलले. त्याअंतर्गत, बिहारची राजधानी पाटणामधून दोघांना अटक करण्यात आली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) वतीने ५ मे यादिवशी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट-युजी परीक्षा घेण्यात आली.
देशभरात सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली. मात्र, विविध प्रकारच्या घोळांचे आरोप झाल्याने ती परीक्षा वादग्रस्त ठरली. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शिफारसीवरून परीक्षेतील घोळांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने तपास हाती घेत आतापर्यंत पेपरफुटी प्रकरणी ६ गुन्हे दाखल केले. त्यानंतर अटकेची पहिली कारवाई करण्यात आली.
मनीष कुमार आणि आशुतोष कुमार या दोन आरोपींना पाटणामधून ताब्यात घेण्यात आले. त्या दोघांनी परीक्षेआधी काही विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. तसेच, त्यांना फुटलेला पेपर आणि त्यांची उत्तरेही पुरवली. विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणावरून बिहार पोलिसांनी याआधीच अर्धवट जळालेल्या अवस्थेतील काही प्रश्नपत्रिका जप्त केल्या. दरम्यान, विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. आता चौकशीसाठी त्यांची कोठडी मिळवण्याचा प्रयत्न सीबीआय करेल.