पुणे : प्लस व्हॅलीतील पाण्याच्या कुंडात शनिवार (ता.२९) दुपारी वाहुन गेलेल्या स्वप्निल धावडे (वय-३८, रा.भोसरी, पिंपरी-चिंचवड) याचा मृतदेह देवकुंड धबधबा येथे सकाळी अकरा वाजता बचावपथकाला मिळून आला.दोन दिवस पन्नास जणांच्या बचावपथकाने भरपावसात शोधकार्य राबविले. शनिवारी (ता.२९) दुपारी स्वप्निल व त्यांचे मित्र प्लस व्हॅली परिसरात पर्यटनासाठी आले होते.
स्वप्निल पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे वाहून गेले. एका कुंडातून दुस-या कुंडात पडले. तेव्हापासून ते दिसून आले नाहीत. जोराच्या पावसामुळे प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा मोठा प्रवाह आला आहे. पौड पोलिस,ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था, शिवदुर्ग टीम लोणावळा, नातेवाईक यांनी प्लस व्हॅलीच्या वरील बाजुच्या पाण्याच्या दोन कुंडांमध्ये व आसपासच्या परिसरात शोध घेतला. तर रोहा-रायगड रेस्क्यु टीम, शेलार मामा रेस्क्यु टीम यांच्या पथकाने प्लस व्हॅलीतून खालील बाजुस प्रवाहीत होऊन तयार होणा-या देवकुंड धबधब्याच्या परिसरात शोध घेतला.
जोराचा मुसळधार पाऊस, दाट धुके, निसरडे वातावरण या मुळे शोधकार्यात वारंवार अडथळे येत होते.मुळशी तालुक्यात डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह प्रथम मिल्कीबार मग प्लस व्हॅलीतून देवकुंड धबधबा येथून रायगड हद्दीत पडतो. हा मृतदेह दोन दिवस वर कुंडामध्ये कोठेतरी अडकून पडला होता. हा मृतदेह आज सकाळी अकरा वाजता देवकुंड धबधब्यातून खाली पडला.व अखेर शोधकार्य थांबले.