नेवासा, (प्रतिनिधी) – पुण्यातील हडपसर या ठिकाणी समाजकंटकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दगड मारून विटंबना केल्याच्या प्रकारामुळे संतप्त सकल हिंदू समाज बांधवांच्यावतीने नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील राजमुद्रा चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.
भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशिष्ट समूहाकडून सातत्यानेच होत असलेल्या अवमानाची शासनाने दखल घेण्याची मागणी करत महापुरुषांच्या होणाऱ्या विटंबनाप्रकरणी कायद्यात कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आराध्य दैवत असून भारतीयांचे ते श्रद्धास्थान आहे मात्र, काही समाजकंटकाद्वारे महाराजांचा सातत्याने अवमान करण्याची मालिका सुरू आहे. पुण्यातील हडपसर या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीला दगड मारून फोडण्याचा प्रयत्न झाला.
या घटनेतील आरोपीला तो मनोरुग्ण असल्याचे सिद्ध करून पाठीशी घालण्याचा झालेला प्रयत्न अत्यंत संतापजनक असून शिवभक्तांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. अशा विकृत समाजकंटक व्यक्तीला कोणत्याही प्रकारे पाठीशी घालण्यात येऊ नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील राजमुद्रा चौकात सुमारे एक तास आंदोलन करण्यात आल्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. यावेळी मोर्चेकऱ्यांचे निवेदन नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी स्वीकारले.
या आंदोलनानंतर वाहतूक शाखेचे किरण गायकवाड, पो.कॉ.बबन तमनर, पो.कॉ.लिपने यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महामार्गावर परिश्रम घेतले. पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.