नेवासा (प्रतिनिधी) – पुण्यातील हडपसर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या प्रकारामुळे संतप्त सकल हिंदू समाजातर्फे नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील राजमुद्रा चौकात शुक्रवारी सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन करुन निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी समस्त हिंदू बांधवांनी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. महापुरुषांच्या विटंबनाप्रकरणी कायद्यात कडक शिक्षेची तरतुद करण्यात यावी अशी मागणीही यावेळी सरकारकडे करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून समाजात जातीयतेढ पसरवली जात असल्याचे यावेळी निषेध मोर्चात विविध मान्यवरांकडून सांगण्यात आले. अशा प्रकारच्या घटनांमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. पुण्यातील हडपसर येथील आरोपीला तो मनोरुग्ण असल्याचे सिद्ध करून पाठीशी घालण्याचा झालेला प्रयत्न अत्यंत संतापजनक असून त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. अशा विकृत व्यक्तीला कोणत्याही प्रकारे पाठीशी घालण्यात येऊ नये अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी मोर्चाकऱ्यांचे निवेदन नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी स्विकारले. या आंदोलनानंतर वाहतूक शाखेचे किरण गायकवाड, पो.कॉ.बबन टमनर, पो.कॉ.लिपने यांनी वाहतूक व्यवस्था सुरुळीत करण्यासाठी महामार्गावर परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरिक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त दिला व आंदोलन शांततेत पार पाडले.