चंदिगढ – हरियाणात भाजपने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे तो पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकट्याच्या जोरावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याविषयीची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केली. हरियाणात वेळापत्रकानुसार ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल.
त्या राज्यात सरकार स्थापनेची हॅट्ट्रिक करण्यास भाजप उत्सुक आहे. त्यातून पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी शहांच्या उपस्थितीत हरियाणातील नेत्यांची बैठक झाली.
त्यामध्ये बोलताना शहा यांनी भाजप इतर कुठल्या पक्षाशी युती करणार नसल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवेल. तसेच, सत्ताही राखेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपने २०१४ यावर्षीच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून हरियाणाची सत्ता काबीज केली.
मात्र, मागील निवडणुकीत (वर्ष २०१९) तो पक्ष बहुमताच्या आकड्यापर्यंत मजल मारू शकला नाही. अर्थात, सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने जननायक जनता पक्षाला (जेजेपी) आणि अपक्ष आमदारांना साथीला घेऊन सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि जेजेपीची युती तुटली. भाजपबरोबर पुन्हा जाणार नसल्याचे जेजेपीने नुकतेच जाहीर केले. त्यापाठोपाठ भाजपनेही स्वतंत्रपणे लढण्याचे निश्चित केले आहे. हरियाणात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हरियाणामध्ये हादरा बसला. त्या राज्यात लोकसभेच्या एकूण १० जागा आहेत. त्यातील निम्म्याच जागा भाजपला जिंकता आल्या. कॉंग्रेसने ५ जागा जिंकून कामगिरी उंचावली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तो पक्ष भाजपपुढे मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.