BJP Meeting | लोकसभा निवडणुकीनंतर सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात आगामी विधानसभाची रणनीती आखण्याची तयारी सुरु झालीय. त्यातच मुंबईत ओबीसी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बहुचर्चित बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील प्रदेश भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावली. ही बैठक तब्बल पाच तास सुरु होती. रात्री आठ वाजता सुरु झालेली ही बैठक उत्तररात्री एक वाजेपर्यंत रंगली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर या निवासस्थानी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासह कोअर कमिटीतील सदस्य उपस्थित होते. ही बैठक रात्री आठ वाजता सुरु झाली होती आणि रात्री एक वाजता संपली. या बैठकीत अनेक मुद्दयांवर सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधान परिषदेसाठी 10 नाव केंद्राकडे पाठवणार BJP Meeting |
दरम्यान, भाजपच्या या कोअर कमिटीच्या या बैठकीत पुढील महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीसाठी कोअर कमिटीकडून 10 नावं निश्चित करुन ती यादी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतील गोळा बेरीज समोर ठेवूनच विधानपरिषदेसाठी उमेदवार निश्चित केले जातील. संबंधित उमेदवाराचा विधानसभा क्षेत्रात किती प्रभाव आहे किंवा त्याला संधी दिल्यास विधानसभा निवडणुकीत जातीय आणि राजकीय समीकरणे कशाप्रकारे साधली जातील, हे मुद्दे विचारात घेण्यात आलेत. या सगळ्याची साधकबाधक चर्चा करुन भाजप कोअर कमिटीकडून विधानपरिषद निवडणुकीसाठीची 10 उमेदवारांची नावे दिल्लीत पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीची ब्लू प्रिंट BJP Meeting |
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदारांची संख्या 23 वरुन थेट 9 पर्यंत खाली घसरली. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपचे जोमाने कामाला लागलेत. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील रणनीतीबाबत प्राथमिक चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एक ब्लू प्रिंट तयार केली जाणार आहे. या ब्लू प्रिंटच्या आधारे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची निवड, प्रचार आणि रणनीती या गोष्टी निश्चित होतील. यासंदर्भात कोअर कमिटीची आणखी एक बैठक होणार असून त्यानंतर प्राथमिक ब्लू प्रिंट निश्चित होणार असल्याचे म्हटले जात आहे.