रायपूर – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा आज प्रकाशित केला. त्यात विवाहित महिला आणि भूमिहीन शेतमजुरांना वार्षिक आर्थिक मदत, 3,100 रुपये प्रति क्विंटल दराने भातखरेदी आणि गरीब कुटुंबांना 500 रुपये दराने स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ही जाहीरनाम्यातील काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला अवघे चार दिवस बाकी असताना हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये दोन वर्षात एक लाख रिक्त सरकारी पदे भरणे आणि अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या दर्शनासाठी राज्यातील लोकांना मोफत यात्रा अशी आश्वासने यात देण्यात आली आहेत.
रायपूर येथील प्रदेश भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘छत्तीसगड 2023 साठी मोदींची हमी’नावाखाली हा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनामा लॉन्च करताना शहा म्हणाले, “निवडणूक जाहीरनामा हा केवळ भाजपचा जाहीरनामा नाही, तर आमच्यासाठी ‘संकल्प पत्र’ आहे. आम्ही छत्तीसगड राज्याची स्थापन केली, भाजपच्या राजवटीत छत्तीसगडचे बिमारू असलेली प्रतिमा बदलून हे एक सबळ राज्य झाले.
शहा म्हणाले, “राज्यात भाजपची सत्ता आल्यास, ‘कृषी उन्नती योजना’ सुरू केली जाईल, ज्या अंतर्गत 21 क्विंटल प्रति एकर धान (शेतकऱ्यांकडून) 3100 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केले जाईल. धान खरेदीचे पेमेंट एकाच वेळेत केले जाईल. पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार ‘महतरी वंदन योजना’ देखील सुरू करणार आहे, ज्या अंतर्गत विवाहित महिलांना प्रति वर्ष 12,000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे दीनदयाल उपाध्याय कृषी मजदूर योजना सुरू केली जाईल, ज्या अंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना प्रतिवर्ष 10,000 रुपये दिले जातील, असे त्यांनी घोषित केले. गरीब कुटुंबातील महिलांना प्रत्येकी 500 रुपयांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर मिळेल, तर विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे महाविद्यालयात जाण्यासाठी मासिक प्रवास भत्ता दिला जाईल.
राज्यात भाजपची सत्ता आल्यास दोन वर्षांत एक लाख रिक्त सरकारी पदे भरली जातील. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 18 लाख घरांच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला जाईल, तर ‘घर घर निर्मल जल अभियान’ अंतर्गत प्रत्येक घरात दोन वर्षात नळ जोडणी दिली जाईल, असे ते म्हणाले.