नवी दिल्ली : मागील अधिवेशनात खासदारकी गमवावी लागलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी सोमवारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला मोठी किंमत चुकवावी लागली. त्या पक्षाने यावेळी मागील वेळेपेक्षा ६३ जागा गमावल्या,असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर लोकसभेत चर्चा झाली. त्यामध्ये पश्चिम बंगालमधून पुन्हा लोकसभेवर निवडून गेलेल्या महुआ सहभागी झाल्या. मागील वेळी मला सभागृहात बोलू दिले गेले नाही. मला शांत करण्याच्या प्रयत्नात जनतेने भाजपला शांत केले. केंद्रातील यावेळचे सरकार स्थिर नाही. ते सरकार घूमजाव करण्याचा इतिहास असणाऱ्या पक्षांवर अवलंबून आहे.
त्याउलट, विरोधी बाकांवर यावेळी आम्ही २३४ योद्धे आहोत. त्यामुळे भाजप यावेळी विरोधकांशी मागील वेळेसारखा वागू शकणार नाही, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली. महिला सक्षमीकरणाविषयीच्या सरकारच्या दाव्यालाही महुआ यांनी आव्हान दिले. महिला शक्तीची धास्ती वाटत असल्याने संसदेतील आरक्षण लांबणीवर टाकण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.