मुंबई – राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर 35 रुपये दर देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. यात दुधाला प्रतिलिटर 30 रु. स्थायीभाव, तर शासनाकडून 5 रु. अनुदान देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहन मिळावे यासाठी सुद्धा शासनाकडून प्रतिकिलो 30 रु. अनुदान देणाचा निर्णय सरकारने घेतला. दुधाचे नवीन दर 1 जुलै पासून राज्यभर लागू होतील, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. ही बाब विचारात घेता, विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सोमवारी राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघ, आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली होती.
सदर बैठकीत आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार सदाभाऊ खोत, आमदार विनायक कोरे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार मोनिका राजळे तसेच राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मिनेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या.
त्यानंतर त्यांच्या मागण्या विचारात घेता राज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रु. भाव देण्याचे सर्वानुमते निश्चित केल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर शासन शेतकऱ्यास 5 रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल. जेणे करून शेतकऱ्याला प्रतिलिटर 35 रुपये मिळून शेजाऱ्यांना दिलासा मिळेल, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
शासन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.