परळी : मरळवाडी गावचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी परळी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले होते नेमके?
पाचही आरोपींनी संगनमताने शहरातील बँक कॉलनी परिसरात सरपंच बापू आंधळे व ग्यानबा गित्ते या दोघांना बोलावून घेतले. यावेळी बापू आंधळे यांना तू पैसे आणलेस का, असे बबन गित्ते म्हणाले. तेव्हा पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. बापू आंधळे यांच्या डोक्यात बबन गित्ते याने कमरेचा पिस्तूल काढून गोळी झाडली. दुसऱ्या एकाने कोयत्याने बापू आंधळे यांच्यावर वार केले. तसेच ग्यानबा गित्ते यांना तिसऱ्याने छातीत गोळी मारून जखमी केले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
गोळीबाराच्या या घटनेत ग्यानबा ऊर्फ गोट्या मारोती गित्ते (वय ३६, रा. नंदागौळ) हा जखमी झाला आहे. जखमीवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्याचा पोलिसांनी जबाब नोंदविला आहे. ग्यानबा गित्ते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी शशिकांत उर्फ बबन गित्ते (रा. बँक कॉलनी), मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते (वाघबेट), महादेव उद्धव गित्ते (बँक कॉलनी), राजाभाऊ नेहरकर (पांगरी), राजेश वाघमोडे (पिंपळगाव गाढे), यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहेत बबन गित्ते?
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बबन गित्तेंनी काम केलं. मुंडेंच्या पश्चात गित्तेंनी अनुक्रमे पंकजा आणि धनुभाऊंना साथ दिली. पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांना साथ दिली. मतभेद झाल्याने ते धनुभाऊंच्या सोबत गेले. धनंजय मुंडेंच्या साथीने गित्तेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही. बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या.परळी पंचायत समितीच्या सभापती म्हणून बबन गित्ते यांच्या पत्नी उर्मिला गित्ते काम पाहत होत्या. पण, त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांची सभापती पदावरून हकालपट्टी झाली. बबन गित्ते यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं केलं. गित्ते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला. गित्ते हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात.