लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण रविवारी (दि. ३०) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे.
लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणस्थान असलेले हे धरण ओसंडून वाहू लागल्याने शनिवार आणि रविवारचा विकेंड गाठून लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे.
मागील काही दिवसांपासून ओढ दिल्यानंतर शनिवारी सकाळपासून सलग पडणाऱ्या पावसाची संततधार रविवारी देखील कायम राहिल्याने येथील डोंगर भागातून धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
स्थानिक युवकांनी धरण ओव्हर फ्लो होण्याच्या बेतात असताना धरणाच्या सांडव्यावरील मोऱ्यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली. शनिवारी सकाळी 7 ते रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासांत लोणावळा शहरात 49 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मागील वर्षीही ३० जूनला धरण भरले
मागील वर्षीदेखील 30 जूनच्या रात्री भुशी धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यामानाने पावसाचा फार जोर नसतानाही यंदा देखील 30 जून रोजीच धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आंनद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी धरणावर मोठी गर्दी केली होती. येथून पुढे पाऊस वाढण्याचीच शक्यता असल्याने लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेता येणार असल्याने आगामी शनिवारी, रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे.
पोलिसबल वाढविण्याची आवश्यकता
भुशी धरण भरल्याने लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार हे निश्चित असल्याने पोलिसांना मोठा ताण सहन करावा लागणार आहे.
त्यातच लोणावळा पोलिसांकडे मर्यादित पोलीस बळ असल्याने मागील दोन आठवड्यात वाहतूक व्यवस्थेचा उडालेला खेळखंडोबा बघता आगामी काळात तर त्याहूनही वाईट परिस्थितीचा सामना पर्यटक आणि स्थानिकांना करावा लागणार आहे.
लोणावळा पोलिसांकडून धरणाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर रायवूड पार्क आणि नौसेना बाग याठिकाणी पोलीस पोस्ट लावण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी तैनात करण्यास पुरेसे पोलिसच उपलब्ध नसल्याने त्या पोस्टचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्वतः लक्ष घालून याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करणे आवश्यक आहे.