T20 World Cup History Hat-Tricks : गेल्या गुरुवारी, टी-20 विश्वचषक 2024 मध्ये, ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस नियमानुसार सुपर 8 सामन्यात बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. या विश्वचषकात पॅट कमिन्स पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि त्याने हॅटट्रिक घेत इतिहास रचला. कमिन्सने दोन वेगवेगळ्या षटकांत या 3 विकेट घेतल्या, पण टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज नाही. चला तर मग जाणून घेऊया, अशा खेळाडूंबद्दल ज्यांनी आजपर्यंत वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे, ज्यामध्ये ब्रेट ली सारख्या दिग्गजाचाही समावेश आहे., जाणून घ्या कोणत्या गोलंदाजांनी केला हा पराक्रम…
ब्रेट ली – टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा ब्रेट ली हा पहिला गोलंदाज होता. 2007 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 3 फलंदाजांना बाद केले. त्याने शकीब अल हसन, मश्रफी मोर्तझा आणि आलोक कपालीचे बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने हा सामना 9 विकेटने जिंकला होता.
कर्टिस कॅम्फर – आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने 2021 विश्वचषकात नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात सलग तीन नव्हे तर चार विकेट घेतल्या. त्याने कॉलिन अकरमन, रायन टेन ड्यूश, स्कॉट एडवर्ड्स आणि शेवटी रोएलॉफ व्हॅन डर मर्वे यांना बाद केले. आजपर्यंत, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सलग 4 विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. आयर्लंडने हा सामना 7 विकेटने जिंकला होता.
वानिंदू हसरंगा – 2021 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा वानिंदू हसरंगा हा दुसरा गोलंदाज होता, त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्कराम, टेंबा बावुमा आणि ड्वेन प्रिटोरियस यांना सलग तीन चेंडूत पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. हसरंगाच्या हॅट्ट्रिकनंतरही श्रीलंकेने हा सामना ४ विकेट्सच्या फरकाने गमावला होता.
कागिसो रबाडा – कागिसो रबाडाने 2021 विश्वचषकाची तिसरी हॅटट्रिक घेतली. इंग्लंडविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. रबाडाच्या घातक गोलंदाजीसमोर ख्रिस वोक्स, इऑन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन यांनी लागोपाठ तीन चेंडूंवर विकेट गमावल्या. रबाडाच्या संघाने, दक्षिण आफ्रिकेने हा सामना 10 धावांनी जिंकला होता.
कार्तिक मयप्पन – युएई (UAE) लेगस्पिनर कार्तिक मयप्पनने 2022 च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. भानुका राजपक्षे, चारिथ असालंका आणि दासुन शांका यांना बाद करत त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली. या हॅट्ट्रिकनंतरही त्याचा संघ श्रीलंकेला 79 धावांनी विजयापासून रोखू शकला नाही.
जोशुआ लिटल – 2024 पूर्वी, आयर्लंड हा एकमेव संघ होता ज्याच्या दोन खेळाडूंनी टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेतली होती. 2021 मध्ये, जोशुआ लिटलने कर्टिस कॅम्फरच्या पुढच्या वर्षी आयर्लंडसाठी हा पराक्रम केला. 2022 मध्ये त्याने न्यूझीलंडच्या केन विल्यमसन, जेम्स नीशम आणि मिचेल सँटनरला बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. तरीही हा सामना आयर्लंडने 35 धावांनी गमावला होता.
पॅट कमिन्स – पॅट कमिन्स हा टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियासाठी हॅट्ट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज आहे. बांगलादेशविरुद्धच्या (टी-विश्वचषक 2024) सामन्यात त्याने महमुदुल्लाह, मेहदी हसन आणि ताहिद हृदय यांना बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना 28 धावांनी जिंकला.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारे फलंदाज…
1. ब्रेट ली – विरुद्ध बांगलादेश (केप टाउन, 2007)
2. कर्टिस कॅम्फर – विरुद्ध नेदरलँड्स (अबू धाबी, 2021)
3. वानिंदू हसरंगा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (शारजाह, 2021)
4. कागिसो रबाडा – विरुद्ध इंग्लंड (शारजाह, 2021)
5. कार्तिक मयप्पन – विरुद्ध श्रीलंका (गीलॉन्ग, 2022)
6. जोशुआ लिटल – विरूध्द न्यूझीलंड (ॲडलेड, 2022)
7. पॅट कमिन्स – विरुद्ध बांगलादेश (अँटिगा, 2024)