पुणे – बारामती मध्ये शर्यतीचा बैल खरेदी करण्याच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका व्यवसायिक तरुणाच्या डाेक्यात पिस्तुलमधून गाेळी मारुन त्यास गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. रणजीत निंबाळकर असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पाेलीस ठाण्यात साेमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांचा मुलगा गाैरव शहाजी काकडे, गाैतम शहाजी काकडे (दाेघे रा.निंबुत, ता.बारामती,पुणे) यांच्यासह तीन अनाेळखी व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ज्या पिस्टलमधून गोळीबार झालेला आहे ते शहाजी काकडे यांचे परवानाधारक पिस्तूल आहे. बैलाचा व्यवहार फिसकटल्याने गोळीबार झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
रणजित निंबाळकर यांना डोक्यात गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांना सुरुवातीला बारामती मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुबी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याप्रकरणात पसार झालेल्या इतर आरोपींचा पोलीस पथके तपास करत आहे.