मुंबई : महाराष्ट्र भूषण, मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. वयाच्या 77 व्या वर्षी नाटक आणि सिनेमा अशा दोन्ही माध्यमात अशोक सराफ काम करत आहेत. आजही ते तितक्याच ताकदीनं अभिनय करतात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. सध्या अशोक सराफ यांचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर कधीच न पाहिलेली अशोक सराफ यांची भूमिका त्यांच्या नव्या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा ‘लाईफ लाईन’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, 2 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनेते माधव अभ्यंकर प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘लाईफ लाईन’ या सिनेमाला 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
अशोक सराफ पहिल्यांदाच साकारणार ‘ही’ भूमिका
आजपर्यंत आपण अशोक सराफ यांना वेगवेळ्या भूमिकेमध्ये पहिले आहे. यामध्ये पोलीस, राजकारणी, व्यावसायिक, कामगार, चोर,सेल्समन अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र ‘लाईफ लाईन’ या चित्रपटात ते डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. ते पहिल्यांदाच ही भूमिका साकारणार आहेत.