Asaduddin Owaisi । ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या घराबाहेर घोषणाबाजी आणि शाई फेकल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी संसद स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 143, 506, 153A आणि 147 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी काही लोकांनी ओवेसी यांच्या निवासस्थानी गोंधळ घातला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
ओवेसी यांच्या निवासस्थानावर हल्ला Asaduddin Owaisi ।
दोन दिवसांपूर्वी काही लोक ओवेसी यांच्या दिल्लीतील ३४ अशोक रोड येथील निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी या लोकांनी इस्त्रायल समर्थक पोस्टर चिकटवले अन् त्यांच्या निवासस्थानावर काळी शाई फेकली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ५ जणांचा सहभाग होता. या लोकांनी ओवेसी यांच्या निवासस्थानाबाहेर पोस्टर लावले. ‘भारत माता की जय, मी इस्रायलसोबत असून ओवेसीला निलंबित करण्यात यावे,’ असे लिहिले होते. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका बदमाशाने म्हटले आहे की, ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्या नेत्याविरोधात देशातील तरुणांनी एक व्हावे.
माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पोस्टर्स हटवले. मात्र, तोपर्यंत पोस्टर लावणारे लोक तेथून निघून गेले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ते लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
ओवेसींचा ‘जय फिलीस्तीन’चा नारा Asaduddin Owaisi ।
AIMIM खासदार ओवेसी यांनी मंगळवारी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला होता. यावर अनेक खासदारांनी आक्षेप घेतला होता. ओवेसी यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘काही अज्ञात बदमाशांनी आज माझ्या घरावर काळ्या शाईने हल्ला केला. दिल्लीतील माझ्या निवासस्थानाला किती वेळा लक्ष्य करण्यात आले याची संख्या आता मी गमावली आहे. जेव्हा मी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांना विचारले की हे सर्व त्यांच्या नाकाखाली कसे चालले आहे, तेव्हा ते असहायपणे उभे राहिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या पोस्टमध्ये टॅग करत ओवेसी म्हणाले, हे तुमच्या उपस्थितीत होत आहे. खासदारांच्या सुरक्षेची हमी मिळेल की नाही ते सांगा. त्यांनी पुढे लिहिले की, माझ्या घराला लक्ष्य करणाऱ्या दोन पैशाच्या गुंडांना मी सांगू इच्छितो, मी त्यांना घाबरत नाही. सावरकरांसारखी भ्याड कृत्ये थांबवा आणि माझा सामना करण्याची हिंमत दाखवा. शाई फेकल्यावर किंवा दगडफेक केल्यावर पळून जाऊ नका.
हेही वाचा
बंगालच्या राज्यपालांनी CM ममता बॅनर्जींविरुद्ध दाखल केला मानहानीचा खटला; काय आहे प्रकरण?