नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना बुधवारी सीबीआयने औपचारिकरित्या अटक केली. त्यानंतर दिल्लीतील विशेष न्यायालयाने केजरीवाल यांना ३ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने याआधीच केजरीवाल यांना अटक केली. त्यामुळे ते सध्या तिहार तुरूंगात आहेत. त्यांना बुधवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यावेळी सीबीआयने केजरीवाल यांच्या अटकेची परवानगी मागणारा अर्ज सादर केला. विशेष न्यायालयाने परवानगी दिल्याने सीबीआयने केजरीवाल यांना औपचारिक अटक केली. मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ती कारवाई करण्यात आली.
आता चौकशी पूर्ण होईपर्यंत जास्तीत जास्त १५ दिवसांपर्यंत केजरीवाल यांना सीबीआय कोठडीत ठेवता येऊ शकेल. मनी लॉण्डरिंग प्रकरणात त्यांची न्यायालयीन कोठडी याआधीच ३ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, केजरीवाल यांनी न्यायालयात ते स्वत:, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पक्ष (आप) निर्दोष असल्याचा दावा केला. सिसोदिया किंवा इतर कुणाला मी कधीच दोष दिला नसल्याचे त्यांनी म्हटले. ईडीनंतर आता सीबीआयने अटक केल्याने केजरीवाल यांच्या अडचणींत भर पडल्याचे मानले जात आहे.