पिंपळे गुरव – अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन वाढवून द्यावे. बालकांसाठी जो आहार येतो तो चांगल्या दर्जाचा द्यावा आणि मागण्या मान्य होईपर्यंत बालकांचा खाऊ घेणार नाही, अशी भावना व्यक्त करत दापोडी परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केले.
अंगणवाडी सेविका, मदतनीस या देशाच्या मानवी विकासदूत आहेत. पूर्व प्राथमिक शिक्षण पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या, शिक्षण इत्यादींद्वारे देशाची भावी पिढी घडवतात. मात्र, अतिशय तुटपुंजे मानधन देऊन त्यांची बोळवण केली जाते. या योजनेस आता पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अंगणवाडीताई अजूनही तुटपुंज्या मानधनावरच काम करत आहेत.
आयसीडीएस ही मुलत: केंद्र सरकारची योजना असून सध्याच्या केंद्र सरकारने सत्तेत आल्यावर अंगणवाडी सेविकांना एक हजार तर मदतनिसांना पाचशे रुपये एवढी वाढ केली होती. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत त्यात एक रुपयाची वाढ केलेली नाही. 25 एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी. त्यात म्हटल्यानुसार अंगणवाडी कर्मचारी ही वैधानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे. तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व सुविधा देण्यात याव्यात. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ताबडतोब भरीव मानधन वाढ जाहीर करावी.
मदतनीस व सेविकांचे मानधन किमान अठरा ते 26 हजार पर्यंत असावे मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीने वाढल्यामुळे ते कमीच पडते तरी मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी. अशा विविध मागण्यांसाठी दापोडी परिसरातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आंदोलन केले.
या वेळी निर्मला शिंदे, राणी कदम, आशा काटे, सुरेखा सुरवसे, रिजवाना शेख, अश्विनी राक्षे, दीपाली माने, नगमा शेख, मनीषा उंबरे, दीपाली माने, सुनंदा काटे, सुरेखा पवार, हिरकणी जगताप, गौरी मोहरे, माधुरी घुले, रेखा काटे, निर्मला माने, झाकीया शेख, चंद्रकला शिवशरण, वैशाली सागळे, माधुरी पिल्ले, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, भाऊसाहेब मुगुटमल, सनी खंडागळे, संदेश बोर्ड, हेमंत वाळुंद्रे, संतोष आडागळे उपस्थित होते.