इंदापूर, (प्रतिनिधी)- इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज येथील शालेय पोषण आहार योजनेमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी झालेला अहवाल व कार्यवाहीची अंमल बजावणी करावी.
संबंधितांवर कडक कारवाई करा. तसेच चौकशी होईपर्यंत संस्थेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक, श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यू. कॉलेज, इंदापूर यांना शालेय पोषण आहार योजना वसुली बाबतचे पत्र 31 मे रोजी पाठवले आहे. तरी देखील ठोस कारवाई होत नाही.
यामध्ये कथीत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार, यामध्ये संबंधित मुख्याध्यापक आणि इतर यांनी अपहार केला आहे. असे चौकशी अहवालावरून सिद्ध झाले असून, त्यांना रक्कम शासन खाती जमा करण्याचे आदेश दिलेले असताना त्यावर अद्याप काही कार्यवाही झालेली दिसत नाही.
1938 सालापासून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर यांचे मार्फत हजारो, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पवित्र कार्य करीत असतानाच, हल्ली अशा घटना घडणे ही शोकांतिका आहे.
शालेय पोषण आहार योजनेमध्ये अपहार होणे, हेच मुळात तालुक्यातील या संस्थेमध्ये शिकणार्या गोर गरीब विद्यर्थ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे. शासन विविध योजनांद्वारे शिक्षण तळागाळात पोहचवण्याचे काम करत असतानाच मुख्याध्यापक आणि त्यांचे भ्रष्ट सहकरी, त्यामध्ये पदाचा गैरवापर करत अडथळा आणताना दिसत आहेत.
मुख्याध्यापक ह्यांच्याबद्दल बर्याच पालकांची तक्रार असल्याचे समजते. नुकत्याच चालू असलेल्या शालेय अॅडमिशन संदर्भात अत्यंत मुजोरीने बोलणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश संदर्भात आगाऊची प्रवेश शुल्काची मागणी करणे, बंगल्यावर जाऊन भेटा म्हणजे त्यांनी सांगितल्यास प्रवेश होईल या सारख्या बर्याच तक्रारी पालक बोलून दाखवत आहेत.
ही संस्था प्रायव्हेट लि. असल्यासारखा कारभार सध्या चालू आहे. इतके सर्व होत असताना संस्थेमध्ये जो अनागोंदी कारभार हे मुख्याध्यापक करत असताना, संस्थाचालक म्हणून अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ हे जाणिवपूर्वक याकडे काणाडोळा करत आहेत. याची गंभीर दखल घेऊन संबंधीतावर कडक कार्यवाही व्हावी.
खासदार सुप्रिया सुळे यांना पाठवले निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आप्पासाहेब जगदाळे व भरत शहा यांनी संबंधित प्रश्नावर, ठोस कार्यवाही होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार पाठवलेली आहे. त्यामुळे संसदेत हा प्रश्न गाजणार हे मात्र नक्की.