सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जावळीतील अमित कदम यांची निवड करण्यात आली असून, जिल्हा सरचिटणीसपदी निवास शिंदे यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकंदर पाटील, आमदार दीपक चव्हाण, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
नूतन कार्यकारिणीच्या निवडीचे अधिकार रामराजे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा कार्याध्यक्षपदी अमित कदम यांची आणि जिल्हा सरचिटणीसपदी निवास शिंदे यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आल्याची घोषणा संजीवराजे यांनी केली.
राष्ट्रवादीची कार्यकारणी सक्षम व भक्कम करण्याकरिता अमित कदम व निवास शिंदे निश्चितपणे योगदान देतील, अशी अपेक्षा मान्यवरांची व्यक्त केली. अमित कदम हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. जिल्ह्यात पक्ष संघटनेमध्ये समन्वय साधण्यासाठी निवास शिंदे यांच्याकडे नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. निवास शिंदे हे आमदार मकरंद पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत. या निवडीबद्दल दोघांचे अभिनंदन होत आहे.