Ahmedabad viral video। भटक्या लोकांकडून केला जाणारा अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यातच आता क्रूरतेची परिसीमा गाठणारी घटना उघडीस आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मृत पावलेल्या एका भटक्या कुत्र्याला गाडीच्या मागे बांधून फरफटत नेल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
पेटाकडून गुन्हा दाखल Ahmedabad viral video।
सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. सदर घटना गुजरातच्या अहमदाबाद येथील असल्याचे सांगितले जाते. एका एक्सयुव्ही गाडीच्या मागे भटक्या कुत्र्याला बांधलेले दिसत आहे. सदर वाहन महामार्गावरून या कुत्र्याला फरफटत घेऊन जाताना दिसत आहे. कुणीतरी मागच्या गाडीतून हा व्हिडीओ काढला, ज्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. अहमदाबादमधील नेमक्या कोणत्या ठिकाणी हा प्रकार घडला, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. पेटा या संघटनेने या प्रकाराची दखल घेतल्यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.
वाहन चालकावर कडक कारवाईची मागणी Ahmedabad viral video।
सोशल मीडिया साईटवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाहन चालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच या घटनेमुळे पुन्हा एकदा प्राण्यांविरोधातील क्रूरतेविषयी देशात एक चांगला कायदा असावा, अशीही मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे.
पत्रकार वर्षा सिंह यांनी एक्सवर हा व्हिडीओ शेअर करताना संताप व्यक्त केला आहे. “माणूस किती क्रूर झाला आहे. हा कुत्रा मृत असेल तरी त्याला गाडीला बांधून फरफटत नेणे योग्य आहे का? गाडी चालविणारा माणूस त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या पार्थिवाला अशापद्धतीने फरफटत नेऊ शकतो का? तो बिचारा मुका प्राणी जिवंत होता, तेव्हाही काही बोलला नाही. आता मेल्यावर काय बोलणार बिचारा?”, अशा शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
पत्रकार कौशिक कंठेचा यांनी सर्वात आधी हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला होता. “अहमदाबादमध्ये माणूसकी हरवली”, असे कॅप्शन देऊन मेलेल्या कुत्र्याला अशाप्रकारे फरफटत नेणे योग्य आहे का? हा प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे कौशिक कंठेचा यांनी टाकलेल्या पोस्टने पेटा (पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स) या प्राणीमित्र संघटनेनेही लक्ष वेधले आहे. पेटाने या पोस्टला रिप्लाय देत असताना त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करून या घटनेची योग्य माहिती देण्यास सांगितले आहे.