सातारा, {संतोष पवार} – सातारा लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल चांगले वातावरण असतानाही शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला राज्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले असताना साताऱ्यात नेमके काय झाले यावरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गरमागरमी सुरु आहे.
कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव व सातारा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घटल्याने शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असून या पराभवाचे खापर अनेकांवर फोडण्यात येत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरापतींमुळेच शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून आ. शशिकांत शिंदे ओळखले जातात. तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जोडली असल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातच त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
संकटाच्या काळात धावून जाऊन मदत करण्याच्या त्यांच्या वृत्तीने गावोगावी त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी पहावयास मिळते. शशिकांत शिंदे यांनी पक्षात झोकून देऊन काम केले. पक्ष अडचणीत असताना परिश्रम घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभर फिरुन त्यांनी राष्ट्रवादीला यश मिळवून दिले. मात्र, या निवडणुकीत ते स्वत: पराभूत झाले. त्यांच्या कार्याची दखल शरद पवार यांनी घेऊन त्यांना विधान परिषदेवर संधी दिली.
त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. जिल्ह्यात व पक्षात वाढलेला त्यांचा दबदबा पक्षात व बाहेरही खटकत होता. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरीही खचून न जाता शशिकांत शिंदे यांनी पक्षाशी बांधिलकी सोडली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर शिंदे यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना संधी दिली. त्यामुळे सुनील माने काहीसे नाराज झाले. एक, दोन बैठकांना माने यांनी दांडी मारल्याने पक्षांतर्गत कलह दिसून आला. मात्र, शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात सुनील माने पुन्हा पक्षात दिसून आले.
शशिकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांनी केला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने, दीपक पवार आदींची तगडी फौज शशिकांत शिंदेंसाठी मैदानात उतरली. उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार व दिग्गजांच्या उपस्थितीत झालेले शक्तीप्रदर्शन पाहून विरोधकांना धडकी भरली.
पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसा यांनी महायुतीसाठी जोरदार प्रयत्न केल्याने याठिकाणी उदयनराजेंना मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, या मतदारसंघात शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाले. कराड उत्तर व कराड दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद असल्याने या ठिकाणी ५० हजारांचे मताधिक्य मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र, कराड उत्तरमध्ये उदयनराजेंना निसटते मताधिक्य मिळाले. कराड दक्षिणमध्येही अपेक्षित आघाडी शशिकांत शिंदेंना घेता आली नाही. कोरेगाव मतदारसंघात आ. महेश शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केल्याने या मतदारसंघात उदयनराजेंना मोठे मताधिक्य मिळाले.
सातारा – जावळी मतदारसंघात सातारा शहर वगळता अन्यत्र शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सुमारे ३७ हजारांचे मताधिक्य उदयनराजे यांनी येथे घेतले. वाई मतदारसंघात आ. मकरंद पाटील व नितीन पाटील यांचे म्हणावे तसे मतदारांनी ऐकले नाही.
मोठा जनसंपर्क तरीही पराभवाचा सामना
शशिकांत शिंदे यांनी पालकमंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष असताना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवली. अडचणीत असलेल्यांना मदत केली. शशिकांत शिंदे यांनी पक्षासाठी जीव ओतून काम केले. पक्षाच्या संकटाच्या काळात कार्यकर्त्यांची मोट बांधून ठेवली. मात्र, शशिकांत शिंदे यांना पक्षातील कुरघोड्यांमुळे अनेकदा अपयश आल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
२०१९ च्या कोरेगाव विधानसभा निवडणुकीत पक्षातील काहींना विरोधात काम केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा बॅंक निवडणुकीत जे घडले ते जगजाहीर आहे.
आता लाेकसभा निवडणुकीतही ज्या मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही त्या भागात कुणी काम केले नाही हे कार्यकर्त्यांना माहित आहे. मात्र, पक्षाने याबाबत माहिती घेतल्यास पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.