T20 World Cup 2024 (Afghanistan vs Uganda) :- टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानने युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानसाठी हा मोठा विजय होता. या सामन्यात रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी अफगाणिस्तानसाठी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी केली, फजल हक फारुकीने ५ बळी घेत युगांडाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अफगाणिस्तानच्या १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडा अवघ्या ५८ धावांत गारद झाला.
𝐀𝐟𝐠𝐡𝐚𝐧𝐢𝐬𝐭𝐚𝐧 𝐖𝐢𝐧! 👏#AfghanAtalan have put on a terrific all-round performance to beat Uganda by 125 runs in their opening game at the #T20WorldCup 2024. 👍#AFGvUGA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/hRUuQ99zBx
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 4, 2024
गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात युगांडाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या अफगाणिस्तानने २० षटकांत ५ बाद १८३ धावा केल्या होत्या. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर युगांडाच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
१४ षटकांपर्यंत भरघोस धावा देणाऱ्या युगांडाच्या गोलंदाजांनी शेवटच्या ६ षटकांत शानदार पुनरागमन करत अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकलले. या ६ षटकांत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना एकही चौकार मारता आला नाही. मात्र युगांडाचे फलंदाज संघाला फारशी साथ देऊ शकले नाहीत. १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा डाव १६ षटकांत ५८ धावांवर आटोपला. रॉबिन्सन ओबुयाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने एका षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या.
युगांडाच्या ११ फलंदाजांपैकी फक्त २ फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. पहिल्याच षटकापासून संघाने विकेट्स गमावण्यास सुरुवात केली. पहिल्याच षटकात फजलहक फारुकीने रौनक पटेल (४) आणि रॉजर मुकासा (०) यांना सलग दोन चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यामुळे संघाला पहिले दोन धक्के बसले. त्यानंतर दुसऱ्या षटकात सायमन सेसाझीच्या (४) रूपाने संघाने तिसरी विकेट गमावली. यानंतर संघाने पाचव्या षटकात दिनेश नाक्राणीच्या (६) रूपाने चौथी विकेट गमावली. त्यानंतर त्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या अल्पेश रामजानीच्या रूपाने संघाला पाचवा धक्का बसला.
फारुकीची चमकदार कामगिरी…
अफगाणिस्तानकडून फजल हक फारुकीने सर्वाधिक ५ बळी घेतले. त्याने ४ षटकात केवळ ९ धावा दिल्या. नवीन उल हक आणि कर्णधार राशिद खान यांना प्रत्येकी २ बळी मिळवले. नवीनने २ षटकांत ४ धावा आणि रशीदने ४ षटकांत १२ धावा दिल्या. उर्वरित एक गडी मुजीब उर रहमानने घेतला.
युगांडाची T20 विश्वचषकातील चौथ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या
युगांडाचा विश्वचषकातील हा पहिलाच सामना होता आणि संघ प्रभावित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. युगांडाने पुरुषांच्या T20 विश्वचषकातील चौथ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्येची नोंद केली. या जागतिक स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम नेदरलँडच्या नावावर आहे.
टी-20 विश्वचषकातील किमान धावसंख्या…
39 : नेदरलँड विरुद्ध श्रीलंका (विश्वचषक 2014)
44 : नेदरलँड विरुद्ध श्रीलंका (विश्वचषक 2021)
55 : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (विश्वचषक 2021)
58 : युगांडा वि अफगाणिस्तान (विश्वचषक 2024)
60 : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (विश्वचषक 2014)