T20 World Cup 2024 (Super 8, AFG vs BAN) – अफगाणिस्तानने इतिहास रचला असून २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. डकर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा ८ धावांनी पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा अफगाणिस्तान हा चौथा संघ ठरला. अफगाणिस्तानच्या विजयासह ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
या स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात होता. अफगाणिस्तानने या विश्वचषकात युगांडाविरुद्ध विजय नोंदवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. अशाप्रकारे अफगाण संघाची विजयी घोडदौड कायम राहिली आणि आता त्यांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत २७ जूनला दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
अफगाणिस्तानने पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. नवीन उल हकने १८ व्या षटकात सलग दोन बळी घेत बांगलादेशला सर्वबाद केले. अफगाणिस्तानाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ११५ धावा केल्या. तर बांगलादेशचा संघ २० षटकांत ११६ धावाही करू शकला नाही. सततच्या पावसाने या सामन्यात मोठा व्यत्यय आणला आणि अखेरीस सामन्याचे एक षटकही कमी केले. ११.४ षटकांनंतर पाऊल पडल्याने डकवर्थ-लुईस नियमानूसार (डीएलएस) अफगाणिस्तानचा संघ पुढे होता. त्यानंतर षटक कमी करण्यात आले आणि लक्ष्य ११४ धावांचे करण्यात आले. पण यानंतरही संघाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला.
𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 – 𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐒𝐓𝐎𝐑𝐌 𝐈𝐍𝐓𝐎 𝐓𝐇𝐄 𝐒𝐄𝐌𝐈𝐄𝐒!!! 🙌#AfghanAtalan have successfully defended their total and have won the game by 8 runs (DLS) to make it to the Semi-Finals of the #T20WorldCup for the 1st time in their history. 👊🤩#AFGvBAN pic.twitter.com/isn1j9zub9
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 25, 2024
सामन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाचा लपंडाव सुरू होता. बांगलादेशकडे अफगाणिस्तानने दिलेल्या ११६ धावा १२.१ षटकांत पूर्ण करत उपांत्य गाठण्याची मोठी संधी होती. पण अफगाणिस्तानने कडवी झुंज दिली. रशीद खानने ४ बळी घेत बांगलादेशला रोखले. तर अफगाणिस्तानने अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत आणि झटपट बळी घेत बांगलादेशवर दबाव टाकला. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी अटीतटीची लढत सुरू होती. बांगलादेशला १८ चेंडूत १६ धावांची आवश्यकता होती. गुलबदीनने १७ व्या षटकात अवघ्या ४ धावा दिल्या. तर १८ वे षटक नवीन उल हकने तिसऱ्या चेंडूवर तस्कीन अहमदला बाद केले तर चौथ्या चेंडूवर मुस्तफिजूरला पायचीत करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तानने दिलेल्या अवघ्या ११६ धावांचे लक्ष्य १२० चेंडूमध्ये पूर्ण करायचे होते. पण बांगलादेश संघ अवघ्या १०५ धावाच करू शकला. अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर फलंदाज जास्त काळ मैदानात टिकू शकले नाहीत. बांगलादेशकडून एकट्या लिटन दासने ४९ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या, तर सौम्या सरकारने १० आणि ह्रदयने १४ धावा केल्या. याशिवाय इतर सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक आणि रशीद खानने प्रत्येकी ४ बळी घेतले. तर गुलबदीन आणि फजलहकने प्रत्येकी १ बळी मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची फलंदाजी बाजू चांगलीच ढासळली. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज वगळता कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. गुरबाजने ५५ चेडूंत १ षटकार आणि ३ चौकारांसह ४३ धावा केल्या. तर इब्राहिम झादरानने २९ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. तर अझमतुल्लाने १०, गुलबदीनने ४ धावा केल्या, नबी १ धाव तर करीम ७ धावा करून बाद झाला. यानंतर रशीद खानने १९ धावा केल्या. यासह अफगाणिस्तानने ५ बळी गमावत ११५ धावा केल्या. अधिक धावा न केल्याने अफगाणिस्तानवर धावा वाचवण्याचे मोठे काम होते. बांगलादेशकडून रशीद हुसेनने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर तस्कीन. मुस्तफिजूरने प्रत्येकी १ बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – अफगाणिस्तान – २० षटकांत ५ बाद ११५ धावा. (रेहमनुल्ला गुरुबाज ४३, इब्राहिम झद्रान १८, रशीद खान १९, रिशाद हुसेन ३-२६). बांगलादेश – १७.५ षटकांत सर्वबाद १०५ धावा. (लिटन दास ५४, तौहिद हिरोदय १४, रशीद खान ४-२३, नवीन उल हक ४-२६).