T20 World Cup 2024 (Super 8, AFG vs AUS) : अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषक 2024 मध्ये मोठा उलटफेर केला आहे. अफगाण संघाने 7 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला आहे. सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 127 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने 6 वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि एकदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे.
𝐀𝐟𝐠𝐡𝐚𝐧𝐀𝐭𝐚𝐥𝐚𝐧 𝐖𝐢𝐧! 🙌#AfghanAtalan creates history with their first-ever win against Australia in international cricket! What a terrific achievement this is from #AfghanAtalan. 🤩👏#T20WorldCup | #AFGvAUS | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/KYAG9fjg07
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 23, 2024
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर गुरबाजने 49 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. इब्राहिम झद्रानने 51 धावांची खेळी केली. त्याने 48 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारले. यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3 बळी घेतले तर ॲडम झाम्पाने 2 बळी घेतले.
अफगाणिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे…
अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरलेल्या दिग्गजांनी भरलेल्या कांगारू संघाने पूर्णत: शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 19.2 षटकात 127 धावा करून त्यांचा संघ ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 59 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार मिचेल मार्श 12 धावा करून तर मार्कस स्टॉइनिस 11 धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. स्टॉइनिस 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅथ्यू वेडही फक्त 5 धावा करून बाद झाला.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी…
अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. गुलाबदिन नायबने 4 षटकात फक्त 20 धावा देत 4 बळी घेतले. नवीन-उल-हकने 4 षटकांत 20 धावा देत 3 बळी घेतले. मोहम्मद नबीने 1 षटकात फक्त 1 धाव दिली आणि 1 बळी घेतला. कर्णधार राशिद खानलाही यश मिळाले. ओमरझाईनेही एक विकेट घेतली.
विश्वविजेते ऑस्ट्रेलियन अफगाणिस्तानसमोर हतबल…
ऑस्ट्रेलियन संघ 7 वेळा विश्वविजेता आहे. पण ते अफगाणिस्तानसमोर हतबल ठरले. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने T20 विश्वचषक जिंकला होता. तसेच त्यांनी 6 वेळा एकदिवसीय विश्वचषकही जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.