पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रम प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी घेण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवार, दि. २९ जून ते ३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिपत्रक राज्य सीईटी सेलने शुक्रवारी प्रसिद्ध केले.
यंदा पहिल्यादांच बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य सीईटी सेलमाफत होत आहेत. यासाठी यापूर्वीच सीईटी घेण्यात आली होती. मात्र, त्याची माहिती नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे अतिरिक्त सीईटीची मागणी होत होती. त्यास राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर सीईटी सेलने प्रक्रिया सुरू केली.
यापूर्वी ज्या उमेदवारांनी २९ मे रोजी घेतलेली परीक्षा दिली आहे, त्यांनाही या परीक्षेची संधी उपलब्ध आहे. उमेदवारांनी दोन्ही परीक्षा दिल्या असतील, तर त्यापैकी सर्वोत्तम असणारे पर्सेंटाइल प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. त्यासाठी उमेदवारांनी आपली सर्वोत्तम पर्सेंटाइलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक असणार आहे.
मागील महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला ४८ हजार विद्यार्थी उपस्थित होते. राज्यात १ लाख ८ हजार ७४१ जागा असताना केवळ ४० टक्के जागा भरल्या जातील एवढ्याच उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यामुळे उर्वरित ६० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याने अतिरिक्त सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.