मुंबई : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बिग बॉस मराठी 3चा स्पर्धक आणि अभिनेता जय दुधाणे याच्या वडिलांचं निधन झाले आहे. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जय दुधाणे याने दिली आहे. वडिलांच्या अचानक जाण्यानं दुधाणे कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. जयने इंस्टाग्राम भावुक पोस्ट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली.
काय लिहिले पोस्टमध्ये?
“मी अशी पोस्ट शेअर करेन असं कधीच वाटलं नव्हतं. 24 जूनच्या मध्यरात्री कार्डियक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्याच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक रत्न होते. ते नेहमी त्यांच्या प्रामाणिक आणि आश्वासक वृत्तीसाठी ओळखले गेले. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. कधीच कोणतं काम त्यांनी पैशासाठी केलं नाही. नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला”.
जयनं पुढे लिहिलंय, “माझ्या सर्व मित्र जे त्यांना अनिल काका म्हणतात, त्यांचे सर्व मित्र जे त्यांना अनिलभाई म्हणतात, त्यांना ओळखत असलेल्या सर्व लोकांसाठी, तुम्ही त्यांना शेवटचे पाहू शकता. ते नेहमी आमच्या हृदयात, मनात असतील. 24 जून 2024 हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस आहे. मी फक्त माझे वडील नाही तर एक सच्चा मित्र, खरा पालक, खरा माणूस गमावला आहे. त्यांना ओळखणाऱ्या सर्व लोकांसाठी ते खरे आणि चांगल्या माणसाची व्याख्या होते.“मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की उद्या या आणि त्यांना शेवटची भेट द्या! माझे योद्धा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. जिथे असाल तिथे देव तुमचे कल्याण करो. तुम्ही कायम माझ्या हृदयात असाल. पप्पा तुमच्यावर मी कायम प्रेम करेन”, असं म्हणत जय भावुक झाला आहे.