नगर, (प्रतिनिधी) – पोटात व काखेत कैचीच्या पात्याने वार करून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. सहारे यांनी रोहन राजेंद्र वडागळे, (वय २४ रा. भिस्तबाग,नगर) आरोपीस दोषी धरून जन्मठेपेची व १० हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आर. एल. कोळेकर यांनी काम पाहिले.
सदर घटनेची हकिकत अशी की,अमोल मुरलीधर थोरात यामधील इतर साक्षीदार व आरोपी यांचे किरकोळ कारणावरून शाब्दीक वाद झालेले होते. त्याकरिता आरोपी याने यामधील साक्षीदार यास भिस्तबाग येथे बोलण्याकरिता बोलाविले होते.
त्यावेळी त्याठिकाणी साक्षीदार व त्याचा मित्र तिथे गेले असता तेथे आरोपी इतर आरोपींनी सदर साक्षीदारास मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी शेजारील फॅब्रिकेशन मध्ये काम करणारा इसम अमोल उर्फ चिवडया मुरलीधर थोरात हा भांडण सोडविण्यासाठी मधे आला असता त्याचा धक्का आरोपी चे वडीलांना लागला कारणाने ते खाली पडले.
त्यामुळे आरोपी रोहन यास राग आल्याने त्याचेकडे असलेले कैचीचे पाते काढून मयत याचे पोटावर तसेच काखेत वार केल्याने तो मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना दि. ३१ मे २०२० रोजी सायंकाळी ६ चे दरम्यान घडली होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात आरोपीचा गुन्हा साबीत करण्याकामी अभियोग पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी विवेक मुरलीधर थोरात, वैद्यकिय अधिकारी, तपासी अधिकारी, मनोहर तुळशिराम रोकडे यांची साक्ष महत्वाची ठरली.
न्यायाधीश एस.व्ही. सहारे यांनी अभियोग पक्षाने सादर केलेला एकंदरीत पुरावा तसेच परिस्थिती जन्य पुरावा ग्राहय धरून आरोपी रोहन वडागळे यास दोषी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
उर्वरीत ३ आरोपीविरूध्द पुरेसा पुरावा नसल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता आर. एल. कोळेकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी व्ही. व्ही. साठे व बोर्डे यांनी सहकार्य केले.